State Schemes
शासकीय आश्रम शाळा समुह योजना उद्देश व स्वरुप
शासकीय आश्रमशाळा समूह योजना
अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणा-या अनुसूचित जमातीच्या लोकांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास जलदगतीने घडवून आणण्यासाठी सन 1972-73 पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. ही योजना मुख्यत्वे अतिदुर्गम डोंगराळ व पाडयातील आदिवासी मुला/ मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन शैक्षणिक दष्टया त्यांना सुशिक्षित करणे व त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे या उददेशाने राबविण्यात येते. शिक्षणाची ज्ञानगंगा द-याखो-यात, दुर्गम पाडयात पोहचविण्याचे काम शासकीय आश्रमशाळांमार्फत होत आहे. या योजनेनुसार अनुसूचित जमाती क्षेत्रात 5000 ते 7000 लोकसंख्येच्या क्षेत्रात एक आश्रमशाळा हा सर्वसाधारण निकष ठरविण्यात आलेला आहे. काही क्षेत्रातील भाग हा अतिदुर्गम असून तेथे लोकवस्ती ही पाडयापाडयांमध्ये विखुरलेली असल्याने अशा काही ठराविक ठिकाणी 3000 ते 5000 लोकसंख्येच्या क्षेत्रास एक आश्रमशाळा हा निकष सन 1982 पासून ठरविण्यात आला आहे.
शासकीय आश्रमशाळा गोषवारा | ||
1 | एकूण मंजूर शासकीय आश्रमशाळा | 553 |
2 | पैकी समायोजित केलेल्या आश्रमशाळा | 48 |
3 | पैकी बंद असलेल्या आश्रमशाळा | 06 |
एकूण ( समायोजित + बंद ) | 54 | |
सद्यस्थितीत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळा | 499 |
स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविण्यास अर्थसहाय्य
आदिवासींच्या शैक्षणिक विकासाकरीता कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थामार्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना 1953-54 पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांकरीता खालील चार प्रकारे अनुदान देण्यात येते.
- वेतन अनुदान:- अनुदानित आश्रशाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते इत्यादी साठी वेतन अनुदान देण्यात येते.
- परिपोषण अनुदान:- अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार व भोजनासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते. सदर अनुदान प्रति विद्यार्थी प्रति माह रुपये 1500/- प्रमाणे देण्यात येते.
- आकस्मिक अनुदान:- अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अंथरुण-पांघरुण, गणवेश, स्टेशनरी, लेखनसामुग्री इत्यादी तसेच शालेय व्यवस्थापनासाठी स्टेशनरी, कार्यालयीन खर्च, इमारत रंगरंगोटी दुरुस्ती इत्यादींसाठी आकस्मिक अनुदान देण्यात येते. आकस्मिक अनुदान हे प्राथमिक विभागासाठी आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 8 टक्के व माध्यमिक विभागासाठी आश्रमशाळा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 12 टक्के व वसतीगृह विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 8 टक्के प्रमाणे देण्यात येते.
- इमारत भाडे अनुदान:-ज्या स्वंयसेवी संस्थानी आश्रमशाळांसाठी इमारीत भाडेतत्वावर घेतल्या आहेत, अशा संस्थांना देय इमारत भाडयाच्या 75 टक्के इतके इमारत भाडे देण्यात येते.
आदिवासी शेतक-यांना विजपंप / तेलपंप पुरवठा करणे.
उद्देश व स्वरुप :
- 1. आदिवासी शेतक-यांना त्यांचा शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याव्दारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणुन आदिवासींचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतुन 100 टक्के अनुदानावर विजपंप / तेलपंप पुरविण्यात येत आहे.
- 2. या योजनेखाली सर्वसाधारण पणे 3 किंवा 5 अश्वशक्तीचे विजपंप / तेलपंप मंजूर करण्यात येतात.
- 3. राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतक-याकडे किमान 60 आर (दीड एकर) आणि कमाल 6 हे.40 आर (16 एकर) इतकी लागवाडीयोग्य जमीन उपलब्ध आहे. अशा शेतकरी या योजनेचा लाभ घेवु शकतात.
पात्रता :
- 1. आदिवासी शेतक-यांना विजपंप मंजूर करतांना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेल्या विहिर / नाल्यास कमीत कमी सहा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- 2. आदिवासी शेतकरी स्वत: जमीन कसत असला पाहिजे.
- 3. 60 आरपेक्षा कमी जमीन ज्यांच्या नांवाने असेल अशा किंवा 3 लगतच्या जमीन धारकांना एकत्रित येऊन करार लिहुन दिला तर एका पेक्षा अधिक लाभधारक एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र अशा एकत्रित आलेल्या शेतक-यांची एकूण जमीन 60 आरपेक्षा जास्त असली पाहिजे.
- 4. या योजनेखाली ज्या गांवात / शेतात विजपुरवठा केला जावु शकतो त्या गावच्या शेतक-यास विजपंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही अथवा नजीकच्या 3 वर्षात केली जाण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी तेलपंप पुरविण्यात येतो.
संपर्क:
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
प्रादेशिक व्यवस्थापक / उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट)
उद्देश व स्वरुप :
ज्या योजनाचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या कर्जविरहीत योजना तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करुन गरजु आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश. आदिवासी व्यक्ती / कुटूंब केंद्रबिंदु मानुन या योजनेतंर्गत
कर्ज देणे अपेक्षित नाही. योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे
- 1. योजनेतंर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तीस / कुटूंबास / सामुहिक प्रकल्पात / कार्यक्रमातंर्गत आर्थिक मर्यादा रु. 15000/- पर्यंत.
- 2. 4 गट नमूद केले असुन
- अ) उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजना
- ब) प्रशिक्षणाच्या योजना
- क) मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या योजना
- ड) आदिवासी कल्याणात्मक योजना
- 3) अ या गटात अनुदानाची मर्यादा खालीलप्रमाणे
- 1) सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी – 85 टक्के व 15 टक्के वैयक्तिक सहभाग
- 2) आदिम जमाती लाभार्थी – 95 टक्के व 5 टक्के वैयक्तिक सहभाग
- 3) जेथे अर्थसहाय्य रु. 2000 असेल तेथे 100 टक्के अर्थसहाय्य.
- 4. शासन निर्णय दि. 31 मे 2001 च्या मार्गदर्शक सुचनातील अटी शर्तीनुसार पात्र लाभार्थी व त्यांनी मागणी केल्या नुसार योजना तयार करुन प्रकल्प अधिकारी यांनी अपर आयुक्ताकडे निर्देश समितीचे अध्यक्ष या नात्याने मंजुरी घेणे.
- 5. योजना मंजुरीचे अधिकार रु. 7.50 पर्यंतच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास रु. 7.50 ते 30.00 लक्षपर्यंतची योजना आयुक्त, आदिवासी विकास व रु. 30.00 लक्ष पेक्षा जास्त रकमेच्या योजनेस शासनाची मान्यता अधिकार प्रदान
- 6. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या एखाद्या योजनेवर अत्यावश्यक आणि अपवादात्मक परिस्थितीत पुरक खर्च न्युक्लिअस बजेट मधुन करावयाचा असल्यास प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडे सादर करणे.
- 7. शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार जे कार्यक्रम न्युक्लिअस बजेट अंतर्गत देता येत नाहीत परंतु स्थानिक परिस्थितीनुसार खास कार्यक्रम घेणे आवश्यक आहे असे निर्देश समितीस वाटल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करणे.
पात्रता :
- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
- 2. अ या गटासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा.
- 3. लाभार्थीनी सर्व कागदपत्रासह योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक.
- 4. योजनेशी संबंधित विविध खात्याच्या जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे सहकार्याने व समन्वयाने योजना राबविणे.
संपर्क:
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवायोजन नोंदणी
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नाव नोंदणी सेवायोजन कार्यालयात करण्यात येत होती. परंतू या उमेदवारांना संधी मिळण्यास फार विलंब होतो हे लक्षात घेऊन शासनाने मागासवर्गीयांच्या नाव नोंदणीचे काम समाजकल्याण विभागावर सोपविले. 1984-85 मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाल्यानंतर हे काम प्रकल्प कार्यालयांकडे सोपविण्यात आले. गरजू, सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नावे नोंदवून तो विविध भरती अधिका-यांकडे शिफारस करुन पाठविणे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश.
नाव नोंदणीच्या अटी:
- 1. नांव नोंदविणारा उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा.
- 2. त्याने विहित नमून्यात जन्मतारीखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला पाहिजे.
संपर्क :
संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
आदिवासी हस्तकला प्रदर्शन
आदिवासी हस्तकला वस्तुंना नागरी भागात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे दुर्गम भागात राहणारे आदिवासी व नागरी भागातील ग्राहक यांना एकत्रित आणून आदिवासींनी हस्तकलेने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करुन त्यांच्या विक्रीव्दारे या कलाकारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत प्रदर्शनात भाग घेणा-या आदिवासी हस्तकलाकारांना जाण्या-येण्याचा खर्च, प्रदर्शन काळातील भत्ता, त्यांनी तयार केलेल्या वस्तुंचा प्रदर्शन स्थळापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च अर्थ सहाय्याच्या स्वरुपात देण्यात येतो. त्याचप्रमाणे प्रदर्शनाच्या व्यवस्थापनाचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येतो.
पात्रता :
- 1. हस्तकलाकार आदिवासी असला पाहिजे.
- 2. त्याने प्रदर्शनात भाग घेण्याची तयारी दाखविली पाहिजे.
संपर्क :
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा
आदिवासी जमातीनुरूप नृत्यांचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. आदिवासींची ही स्वत:ची संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने व या नृत्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत विविध जमातींच्या नृत्य पथकांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धाकरिता नृत्य कलाकारांना त्यांच्या गावापासून स्पर्धाच्या गावापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च, हजेरी भत्ता, तसेच पारंपारिक वेषभूषा व वाद्यांसाठी अनुदान देण्यात येते. तसेच स्पर्धा आयोजनाचा खर्चही शासनाकडून केला जातो.
संपर्क :
संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
वारली चित्रकला स्पर्धा योजना
ठाणे जिल्हयातील वारली या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणा-या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे देण्यात येतात.
पात्रता :
- 1. स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकास वारली चित्रकला येत असावी.
संपर्क :
संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
तुषार ठिबक सिंचन योजना
उद्देश व स्वरुप :
सदरची योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी पाणी हा सर्वात मोठा घटक आहे. जलस्त्रोत अपूर्ण असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा सुयोग्य पध्दतीने परिणामकारक वापर करण्यासाठी ठिबक व तुषार संच बसविण्याची पध्दत प्रचलित आहे. पाण्याचा वापर कमी होऊन पीक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्याची योजना 1986-87 साली सुरु करण्यात आली. या योजनेखाली 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन धारण करणा-या आदिवासी शेतक-यांना 50 टक्के पर्यंत परंतु जास्तीत जास्त रु. 20,500 /- च्या मर्यादेत, 2 ते 6 हेक्टरपर्यंत जमीन धारण करणा-या आदिवासी शेतक-यांना रुपये 14,350 /- एवढे कमाल मर्यादेच्या अधिन राहून 35 टक्के एवढे अर्थसाहाय्य 6 हेक्टरपेक्षा जास्त जमीन धारण करणा-या आदिवासी शेतक-यांना रु. 12,250 /- च्या कमाल मर्यादेच्या अधिन 30 टक्के दराने अर्थसहाय्य दिले जाते.
पात्रता :
- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.
- 2. स्वत:ची जमिन असावी.
- 3. पाण्याचे स्त्रोत व पाण्याची उपलब्धता असावी.
संपर्क :
गटविकास अधिकारी, तालुका पंचायत समिती / अधिक्षक कृषी अधिकारी जिल्हा परिषद.
शेळया मेढयांचा गट पुरवठा करणे
उद्देश व स्वरुप :
आदिवासींच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल या उद्देशाने पशुसंवर्धन या कार्यक्रमाखाली विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
या योजनेअंतर्गत 10 शेळया अ 1 बोकड असा गट आदिवासी लाभार्थींना 50 टक्के अनुदानावर पुरविला जातो. नाबार्डच्या प्रचलित दरानुसार गटाची किंमत ठरविण्यात येते.
पात्रता :
- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
- 2. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी असावा.
संपर्क :
गटविकास अधिकारी, पंचायत समिती / व जिल्हा परिषद अंतर्गत गटविकास अधिकारी.
अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन करणे
उद्देश व स्वरुप :
आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प घेण्यात आल्यामुळे मोठया संख्येने जलाशये निर्माण झालेली आहेत. त्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यत: किनारा नसलेल्या जिल्हयामध्ये आदिवासी लोकांचा मच्छिमारी व्यवसाय हा अर्धवेळ आहे व त्यावर काही प्रमाणात त्यांचा उदरनिर्वाह चालत आलेला आहे. नविन पध्दतीचा अवलंब करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत निरनिराळया योजना राबविण्यात येत आहेत. गोडया पाण्यातील मत्स्यशेती करिता जलद क्षेत्रात जलद वाढणा-या माशांच्या जातीची बीज निर्मिती करणे व उपलब्ध जलक्षेत्राचा वापर जास्तीत जास्त मत्स्यपालनासाठी करणे हा होय. या योजनेखाली सहकारी संस्थांना तसेच स्थानिक संस्थांना बीज संचयनासाठी बीजाचा सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येतो. त्याचप्रमाणे संवर्धन, तळयाचे बांधकाम, खाद्य तसेच खताची खरेदी यावर अनुदान देण्यात येते. मत्स्योत्पादन वाढविणे व ग्रामीण आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पात्रता :
- 1. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
- 2. लाभार्थी त्या लाभक्षेत्रातील असावा.
- 3. मच्छिमारीचे त्याला ज्ञान उपजत असावे.
संपर्क :
जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी.
सहकार विभाग – वैयक्तिक लाभाच्या योजना व्याज अनुदान
उद्देश व स्वरुप :
आदिवासी सहकारी संस्थांच्या आदिवासी सभासदांना सवलतीच्या दराने पीक कर्ज वितरीत केले जाते त्यावरील व्याजापोटी अनुदान शासनामार्फत अदा केले जाते.
आदिवासी शेतक-यांना व्याज अनुदान देण्यासाठी निरनिराळया योजना राबविण्यात येतात त्यापैकी वरीलप्रमाणे योजना आहे.
पात्रता :
- 1. आदिवासी सहकारी संस्थेचा सभासद असावा.
- 2. स्वत:च्या नावे शेती असावी.
- 3. मंजूर कर्जाची परतफेड 30 जून च्या आत केलेले लाभार्थी.
संपर्क :
- 1. संबंधित जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक.
- 2. स्थानिक आदिवासी सहकारी संस्था.